दिव्यांगांचे शासकीय अनुदान कोषागारात पडून...लाभार्थी वंचित....


ग्रामीण भागातील दिव्यांगांना मात्र लाभ
प्रतिनिधी :नाशिक
 कोरानाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आल्याने समाजातील अनेक घटकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार आणि सामाजिक संस्थांकडून सर्वतोपरी पर्यंत केले जात असून, शासनानेदेखील दिव्यांगासाठी दरमहा देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करून दोन हजार रुपये जिल्ह्यांना पाठवून देण्यात आले आहे.

मात्र कोषागारात रक्कम जमा होऊनही दिव्यांगाच्या खात्यात पैसे टाकण्यात आले नसल्याने शहरातील दिव्यांग बांधव लाभापासून वंचित आहेत. संचारबंदीच्या काळात दिव्यांगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांची होणारी गैरसोय आणि आर्थिक अडचण लक्षात घेता शासनाने दिव्यांग व्यक्तींना रेशनच्या माध्यमातून धान्य आणि दिव्यांगांना दरमहा मिळणाऱ्या एक हजार रुपयांच्या अनुदानात आणखी एक हजारांची वाढ केलेली आहे. मार्च महिन्यात सर्व जिल्ह्यातील संबंधित कार्यालयात शासनाने दिव्यांगांसाठीची रक्कम पाठविली देखील आहे. नाशिकमधील दिव्यांग बांधवांसाठी आलेली रक्कम संजय गांधी निराधार कार्यालाने तत्काळ ट्रेझरीमध्येदेखील जमा केलेली आहे. मात्र ट्रेझरीने अद्याप दिव्यांगाच्या खात्यावर रक्कम जमा केली नसल्याचा आरोप दिव्यांग कल्याण संघटनेने केला आहे. शासनाकडून दिव्यांगांची दखल घेतली जात असताना शासनाच्याच कोषागार विभागाकडून मात्र विलंब होत असल्याने दिव्यांग बांधवांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बिलांचे कामकाज नियमित करणाऱ्या कोषागार कार्यालयाने मात्र दिव्यांगांचा निधी अद्यापही वितरित का केला नाही याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी संघटनेने केलेली आहे. दिव्यांगांसाठी असलेला निधी आणि योजनांची अंमलजबावणी करण्यासाठी शासनाचे आदेश आहेत. कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे. असे असतानाही कोषागार कार्यालयाकडून विलंब होत असल्याने दिव्यांगांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाकडून दिव्यांगांसाठी प्राप्त झालेला निधी संजय गांधी निराधार कार्यालयाला प्राप्त झालेला आहे. संबंधित अधिकान्यांना याबाबत विचारणा केली असता गेल्या २५ मार्च रोजीच निधी कोषागार कार्यालयात टाकण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र अजूनही दिव्यांगांच्या खात्यावर रक्कम झालेली नाही. थोडीशी रक्कमही या काळात महत्त्वाची असताना कोषागार विभागाने दिव्यांगांचा निधी वितरित करावा. - बबलू मिझा, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण संघटना