बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यात दोन शिक्षकांसह चौघे अटकेत.




 
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून त्याच्या आधारे शासकीय नोकरी व विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (1 जानेवारी) सायंकाळी चौघांना अटक केली. यामध्ये दोघांनी शिक्षक म्हणून, तर एकाने तहसील कार्यालयात लिपिक पदावर नोकरी मिळवली असल्याचे उघड झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये भारत भागीनाथ फुंदे (वय 34, रा. भुते टाकळी, ता. पाथर्डी) – गदेवाडी (ता. शेवगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, नागनाथ जगन्नाथ गर्जे (वय 34, रा. भगवाननगर, पाथर्डी) – मंगळूरपीर (जि. वाशिम) तहसील कार्यालयातील लिपिक, देवीदास प्रकाश बोरूडे (वय 35, रा. तनपुरवाडी, ता. पाथर्डी) – पुणे महापालिकेच्या मुंढवा शाळेतील शिक्षक तसेच खंडेराव ज्ञानोबा फुंदे (वय 32, रा. भुते टाकळी, ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे. खंडेराव फुंदे याने बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा संशय असून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.

जिल्हा रूग्णालयातील काही कर्मचार्‍यांच्या संगनमताने कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता तसेच रूग्णालयात अधिकृत नोंद न करता थेट ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यात आल्याचा प्रकार जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या अंतर्गत चौकशीत उघडकीस आला होता.

या प्रकरणी जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश उगले तपास करीत आहेत.

दरम्यान, या गुन्ह्यातील जिल्हा रूग्णालयातील एका संशयित कर्मचारी आरोपीचा मृत्यू झाला आहे. तसेच या प्रकरणातील काही आरोपींनी यापूर्वी अटकपूर्व जामीन घेतल्याची माहिती आहे. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या चौघांना आज (शुक्रवारी) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने नोकरदार वर्गात मोठी खळबळ उडाली असून, अशाच पद्धतीने आणखी काही जणांनी शासकीय नोकऱ्या मिळवल्याचा संशय पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.